Saturday, April 4, 2020

पोवारी बोली आणि लोकसाहित्य : एक दृष्टिक्षेप.

              फ्लोरिडा (अमेरिका) येथील एक स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक न्याय व अधिकारांकरिता लढणारी एक्टीव्हिस्ट (कार्यकर्ती) एल.आर.नाॅस्ट यांच्या एका प्रसिद्ध कवितेतील काही ओळी अशा आहेत ----
आपलीच कहानी बोलावी 
आपलीच कहानी सांगावी 
स्पष्ट, बुलंद आवाजात 
क्वचित अस्पष्ट बडबडीत सुद्धा ___
पण लिहावीच..., बोलावीच..., सांगावीच...,
आपली कहानी. 
काही स्वनामधन्य समजू शकणार नाहीत 
आमची ही कहानी, 
काही प्रतिष्ठित एखादेवेळी  
करतील अस्वीकार सुद्धा.
तरी काही लोक आहेत अजून 
जे समजू शकतील आमची कहानी,  
मानतील आमचे आभारही.
आणि नंतर घडेल 
एक जादू , एक चमत्कार...
येऊ लागतील मग काही अगम्य आवाज स्वीकाराचे,
काही कुजबुज सुद्धा स्वागताची.
पसरेल आसमंतात मग स्वर  ---
"मला सुद्धा सांगायचंय..., बोलायचंय..., लिहायचंय...,"
आणि मग संगठीत होईल 
तुमचा समाज 
तुमचे आप्तगण 
तुमचा कुळ सुद्धा  ----
तेव्हा तुम्ही उमजून जाल 
की
तुम्ही आता एकटे-दुकटे राहिला नाहीत !
     पोवार/पवार/पँवार समाज आणि त्यांची पोवारी/पवारी/पँवारी बोली सुद्धा वरील कवितेत नमूद वस्तुस्थितीप्रमाणेच आज अव्यक्त स्वरूपात लोकसाहित्याच्या एका कोप-यात दडलेलीच असून या बोलीच्या "बोलकां"ना एल.आर.नाॅस्ट सारख्या एखाद्या कवीच्या/प्रोत्साहकाच्या प्रोत्साहनपर मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. वस्तूतः पोवारी बोली ही खूप प्राचीन बोली असून इंग्रज भाषाविदांनी सुद्धा या बोलीच्या प्राचीनतेची ग्वाही दिलेली आहे. डाॅ.गणेश देवी यांच्या "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण" या प्रकल्पांतर्गत पद्मगंधा प्रकाशन, पुणे द्वारा प्रकाशित "महाराष्ट्र" या खंडात महाराष्ट्रातील एकूण 60 बोलीभाषांची प्राथमिक माहिती देऊन त्यांची ओळख करून देण्यात आली आहे. या 60 बोलीभाषांच्या यादीत 9व्या क्रमांकावर पोवारी बोलीभाषेची अकरा पृृष्ठांमध्ये नोंद घेण्यात आली आहे. या नोंदी काहीशा फसव्या, भ्रामक, त्रुटीपूर्ण, इतिहासाच्या एकांगी व इतिहासाचे विकृत/भ्रमित आकलन असलेल्या अशा असल्या तरी पोवारी बोलीभाषेची नोंद एका विश्वस्तरीय शोध-प्रकल्पात झाली याचे अल्पसे समाधान आहे. (या नोंदींच्या यथायोग्य दुरुस्तीसाठी मी डाॅ.गणेश देवी यांच्यासोबत पत्रव्यवहार केल्यावर त्यांनी त्यातील चूक अप्रत्यक्षरित्या कबूल केली असून पुढील आवृत्तीमध्ये ह्या चुकांची दुरूस्ती करण्यात येईल असे मला त्यांनी कळविले आहे. त्यावर माझा सतत पाठपुरावा सुरू आहे.)  

      परंतु ह्या बोलीला स्वतःची स्वतंत्र अशी वेगळी लिपी नसल्याने ही बोली लिपीबद्ध मात्र होऊ शकलेली नाही. आदिवासी समाजाच्या बोलींसारखीच ही बोली सुद्धा फक्त बोलचालीत, लोकगीतात, लोकसाहित्यातच वाचिक/मौखिक व अप्रकाशित स्वरूपातच दडून राहिलेली आहे. परंतु गेल्या सुमारे 40-50 वर्षांच्या पोवार-समाज-जागृतीच्या चळवळीने ह्या बोलीला देवनागरी लिपीत लिपीबद्ध करायला प्रारंभ करून दिला आहे. जयपालसिंह पटले, डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे,.. सारख्या आज पंच्याहत्तरी पार केलेल्या/तथा एडव्होकेट मनराज पटले या दिवंगत झालेल्या समाज धूरीणांनी या बोलीला देवनागरीचा शिरेटोप चढवला असून आता लखनसिंह कटरे, देवेंद्र चौधरी, डाॅ.शेखराम येळेकर, रणदीप बिसने, पालिकचंद बिसने, तुफानसिंह पारधी, वाय.सी.चौधरी, आशिष अंबुले, देवेंद्र वासुदेव रहांगडाले, देवेंद्र (बंटी) रहांगडाले, वर्षा पटले-रहांगडाले, हिरदीलालजी ठाकरे, महेंद्रकुमार रहांगडाले, महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले, चिरंजीव बिसेन, ...... इत्यादी सुमारे 50-60 पोवारी-बोली साहित्यिक देवनागरी लिपीत पोवारी बोलीला आधुनिक कविता, कथा, लेखादींच्या रुपात लिपीबद्ध करीत आहेत. यवतमाळ येथे 2019 ला संपन्न झालेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, इतिहासात प्रथमच, पोवारी बोलीतील कविता सादर करण्याचा मान, पोवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळाचे सचिव श्री.देवेंद्र चौधरी यांना मिळाला आणि पोवारी बोलीला एका मोठ्या/अखिल भारतीय स्तरावरील व्यासपीठावरून व्यक्त होता आले. 

     असे असले तरी गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तथा बालाघाट, छिंदवाडा, शिवनी, बैतुल या मध्यप्रदेशातील जिल्ह्यांत गावागावात वसलेल्या पोवार समाजाच्या महिलांकडे (काही पुरुषांकडे सुद्धा) असलेला लोकगीते आणि इतर लोकसाहित्याचा खजिना अजून पूर्णत्वाने लिपीबद्ध व्हायचा आहे. हा संपूर्ण खजिना मौखिक रुपात पोवारी-महिला/पुरुषांच्या कंठात आणि मना-हृदयातच दडून आहे. या संदर्भात गेल्या 03 नोव्हेंबर 2018 ला "पोवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळा"ची स्थापना करण्यात आली असून दि.03 फेब्रुवारी  मार्च 2019 ला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा या तालुकास्थळी पहिले एक दिवसीय अखिल भारतीय पोवारी बोली/भाषा साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न करण्यात आले. या संमेलनातील संपूर्ण कामकाज फक्त पोवारी बोलीभाषेतच पार पाडले जातात. 

    कोणतीही बोली आणि त्या बोलीभाषेतील लोकसाहित्य हे ॲकेडेमिक, घडवलेल्या बोनसाय वृक्षांसारखे एखाद्या राजपथावरील शोभादालनांसम नसते, तर ते यापेक्षा वेगळ्या अशा उबडखाबड भूमी, पठार, पहाडांवर अस्ताव्यस्त रुपात वाढलेल्या व लालभडक अग्निसंभार सांभाळून, पायपथासम जनपथाची शोभा वाढवत उभे असणा-या पलाशवृक्षांसारखे असते. आणि पोवारी बोलीभाषेतील लोकसाहित्य सुद्धा याला अपवाद नाहीच. असा हा ऐतिहासिक दस्तावेज लिखित व प्रकाशित स्वरूपात अभ्यासकांपुढे संशोधनासाठी ठेवणे अनिवार्यपणे आवश्यक ठरते. परंतु पोवारी बोलीतील लोकसाहित्याच्या अशा प्रकाशनाची पुरेपूर व्यवस्था अजून तरी मोठ्या प्रमाणात झालेली नाही, हे खरे आहे. 

    त्यातल्या त्यात डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी त्यांच्या "पोवारी/पवारी ज्ञानदीप" या लघु-शोध-ग्रंथात काही पोवारी लोकगीते व लोकसाहित्य संकलित करून प्रकाशित करण्याच्या महत्कार्याला यशस्वी हातभार लावला आहे. मुख्यतः लिखित आणि प्रकाशित साहित्यावरच कोणत्याही भाषेच्या अस्तित्व व महत्वाचे आकलन व तिचा अभ्यास शक्य असल्याने या वाचिक/मौखिक व अप्रकाशित स्वरूपात दडून असलेल्या पोवारी लोकगीतांना व इतर लोकसाहित्याला लिखित व प्रकाशित स्वरूपात आणण्यासाठी पोवारी साहित्य कला संस्कृती मंडळ प्राथम्याने कार्यरत झाले आहे.

    एक हिंदी भाषाशास्त्री डाॅ.मंजू अवस्थी (D.Lit.) यांनी त्यांच्या भाषा-बोली विषयक संशोधनात पोवारी बोलीच्या संशोधनदरम्यान असे विधान केले आहे की, जगातील कोणत्याही बोली/भाषेतील पहिले लोकगीत हे पोवारी/पँवारी/पवारी बोलीतील आहे. 

     अशा या प्राचीनतम अशा पोवारी/पँवारी/पवारी बोली/भाषेतील दोन लोकगीत व एक लोककथा, त्यांच्या मराठी भावानुवादासह, उदाहरणादाखल खाली देत आहे. 

१) विवाह गीत -
------------------
लग्नप्रसंगी मंडप सुताई दस्तूराचे वेळी गाईले जाणारे गीत-

बारा डेरी को मांडो गळी से ||धृ॰||

मांडो पर मंडाईन चला बेरू 
बेरूईन पर बिछाईन जांभूर की डारी 
जांभूर को डारी खाल्या शोभसे आंबा की तोरन ||१||

जवाई रामलाल मांडो सूत से 
सूत गोईता जवाई बापू तुमरो सेला घोरऽ से 
तोरन गोईता जवाई बापू तुमरो कास्टोऽ सुटसे ||२||

कुकू मा डोईता, सीता वो बाई 
तुमरी अंगोरी लाल भई से 
मांडो मा तोरन लगी से ||३||

(भावानुवाद :- बारा लाकडी खांबाचा मांडव उभारला आहे. मांडवावर ओले बास/वेळू, बासांवर जांभळाच्या  फांद्या आणि मांडवाखाली आंब्याचा पानाचे तोरण लावले आहे. 
जावई रामलाल (रामाचे लोक-नाव) मांडवाभोवती सुत गुंडाळतो आहे. त्यावेळी जावई बापूंचा शेला जमीनीवर सरपटतो आहे, जावयाचा कास्टा (धोतराचा कास्टा) सुटत आहे.
रामलालची पत्नी, त्याघरची लेक, सीता, (जावयाकडून) आपल्या डोईवर कुंकू लावून घेत आहे, त्यामुळे जावयाचे/तिचे बोट लाल झाले आहे. आणि मांडवाखाली तोरण लागली आहे.)

२)जात्यावरील गीत -
---------------------------
दरन मी दरूसू 
~~~~~~~~~
दरन मी दरूसू गा बाई, दरूसू पाच दाना 
मोरो माहेर को कारखाना ||

दरन मी दरूसू गा बाई, जानू पह्यले माता पिता 
मंग जानू मी राम सीता ||

दरन मी दरूसू गा बाई, दरूसू च्यार गहू 
राज करजो मोरो भाऊ ||

दरन मी दरूसू गा बाई, दरूसू कनकी पीठ 
मोरो माहेर को मुंग्या जोट ||

पंढरपूर की विठ्ठल रूखमाई 
रूखमाई से आंगन मा 
पानी भर् से रांजन मा 

दूर ल् आरखू मी मोरो भाई की चाल 
डावो हातमा दिस् से, झोरा लाल लाल ||
(संकलन - सतनबाई चौधरी, तोतलाडोह, जि.नागपूर)

भावानुवाद :- मी दळण दळते, पाच दाणे, माझ्या माहेरी मात्र 'कारखाना' आहे. दळण दळताना मला प्रथम आठवतात, माझे मायबाप आणि त्यानंतर राम सीता. मी चार दाणे गहू दळते, माझा भाऊ राज करेल. मी कणिक, पीठ दळते, माझ्या माहेरी मात्र मुंग्याही खातात (कणिक/पीठ). पंढरपूरातील विठ्ठलाची रूखमाई विठ्ठलासोबत माझ्या आंगणात आली आहे, ती रांजनात पाणी भरत आहे. मी दुरूनच माझ्या भावाच्या पावलांची चाहूल ओळखते, त्याच्या डाव्या हातात मला लाल रंगाचा थैला दिसतोय.
°°°
यानंतर एक उदाहरण पोवारी/पँवारी/पवारी लोककथा-सदृश्य अर्वाचीन कथेचे पाहू या -----

• राजकन्या सुरेखा, अरुना अना अमात्य-पुत्र...
-------------------------------------------------------------------
       राजा तैलादित्य येव एक महापराक्रमी राजा भय् गयेव. वोको राज्य सिरीफ सत्ताईस गावपुरतोच होतो, वोन कारन लका इतिहासमा वोकी नोंद दिस् नही. राजा तैलादित्य ला वोन समयको रिवाजापरमाटी तीन प्रमुख रानी होती. बायजादेवी, सयजादेवी आणि सारजादेवी. येको अलावा बिन-बिह्या की अनखी काही नारी अना दासी होतीच राणीवसामा. पयलो राणीला, बायजादेवीला दुय टूरी च होती. उनको नाव सुरेखादेवी अना अरुनादेवी. बाकी की दुय रानीहिनला औलाद नोहोती. राजबैैदन् बोहूत दवाई पानी करीस अना राजपुरोहितन् सब प्रकारको नवसादि-पूजापाठभी कराईस. पर वोन दुय रानीहीनला संतान को फायदा नही भयेव होतो. वय् दुुुही बिना-संतानच रही. वोको कारन लका मोठो रानी को वचक जरा जास्तीच होतो. राजा तैलादित्य को राजगद्दीवर बसनारो राजपुत्र नोहोतो तरी दुय सुंदर-सुंदर अना हुशार टूरी रहेवलका बायजादेवी को महत्व बाकी को दुय रानीपेक्ष्या जरा जास्तीच होतो.

      तसो देखीस त् राणीवसामाकी बिन-बिह्या की काही नारी अना दासीहीनला टूरुपोटू भया होता. पर वोन टूरुपोटू को खरो बाप को बारा मा राजा अना राजपुरोहितलाभी जरा शंकाच होती. असी साधार शंका रहेवलका राजाभी वोन टूराहीन ला राजपुत्र को दर्जा देय नही शकत होतो. तरी वोन टुराहीनपैकी एक टुरा जो बिन-बिह्या को  कमलजा नावको नारी को टुरा  होतो, वोको बल, बुद्धी व विद्या को प्रावीण्यलका वोला वोको उमर को सोरा साल माच् लहानो/कनिष्ठ अमात्य की जबाबदारी देनोमा आयी होती. वोन वा जबाबदारी बहुत चांगलो हिसाबलका संभालीभी होतीस. भयेव असो का, राज्य को सत्तावीस गावपैकी एक बरबसपुरा नावको गावको एक महाजनन राजा को खिलाफ बंड करी होतीस. तब् वोन टुरान् वू बंड मोडस्यानी काढी होतीस. तबपासना वोन टुरा को, (वोको नाव कचरुमल) महत्व राजदरबार मा बढन् लगेव् होतो. 
        कचरुमल को बढतो महत्त्व मुख्य अमात्य ढेरूमलला जरा टोचन् लगेव् होतो. काहे का भविष्य मा मंग्-पुढ् मुख्य अमात्य की जागा वोला मिल सकसे या बात मुख्य अमात्यला खटकत होती. मूनस्यार अमात्य ढेरूमलन् धीरू धीरू मोठी रानी बायजाबाई का कान भरनला सुरूवात करी होतीस. वोको परिनाम असो भयेव का, बायजाबाई की दुयी टूरी  सुरेखादेवी अना अरुनादेवी इन न राजदरबारमाको आपलो आवनो-जावनो अना अस्तित्व बढावनो सुरू करीन. लाहानी राजकन्या अरुनादेवी जरा जास्तच हस्तक्षेप करत होती. वोन राजकन्याको राजदरबारमाको अना राज्यकारभारमाको  बढतो आवनो-जावनो अना हस्तक्षेप देखस्यार राजा तैलादित्य मात्र मनको मनमा खुश/हर्षित होत होतो. येन् खुशीमा मुख्य अमात्य ढेरूमलको छुपेव् कारस्थानाकी उकल राजा तैलादित्यला करताच नही आयी.

      असोमाच् एक दिवस राजा तैलादित्य महारानी बायजादेवीको  महलमा रवतानीच् मुख्य अमात्य ढेरूमलन  परवानगी लका महलमा प्रवेश करीस अना राजाला याद कराय् देईस का आता दुही राजकन्या बिह्या लायक भयी सेती. वोको कारन आता उनको बिह्या की तजवीज करे पायजे. मोठी राजकन्या सुरेखादेवी लायीक दुसरो राज्य मालका एक सोयस्कर घरजवाई आनस्यानी वोको राज्यभिषेक करन को अना अरुनादेवी साठी जवर को राज्य को एखाद् राजा को चांगलो रूप, शक्ती, बुद्धी, विद्यालका प्रवीन राजपुत्रको संग् बिह्या कर देनको. वोकोलका राज्य की विभागनी नही होनकी अना दुही राज्यकन्याहीनला आपआपलो राज्य भेट सके.

     दुसरो दिवस राजदरबार मा येन निर्णय को घोषणा करनो मा आयी अना नवरदेव देखन की तयारी सुरू भयी.  कनिष्ठ/लहानो अमात्य कचरूमल पर सुरेखादेवी अना अरुणादेवी इनको साठी चांगला टुरा धूंडन की जवाबदारी सोपी गयी. अना चैत्र महिना को पोर्णिमाला बिह्या की आखनी को कार्यक्रम तयार करनोमा आयेव्. राजदरबार मा येव् निर्णय घोषित भयेव् वोन दिवस फागून महिना को शुक्ल पक्ष की पंचमी होती.
       राजा तैलादित्यको आदेशनुसार सब आपापलो कामगिरीमा रुजू भया. दिवस भराभर खतम होन लग्या. होरी आयी ना गयी. परसा फुलाय गयेव्. मुुुहुुरत जवर आवन् लगेेव्. असोमाच् काहीतरी गडबड होय रही से, असो लगन् लगेव्. काही-बाही कूजबूज आयकू आवत होती पन राजा तैलादित्य अना मुख्य अमात्य ढेरूमल शांत चित्तलका वोकोमालका /वोकोपरा उपाय काहाळ् लेयेत् असो लगत् होतो.

       पर बीचमाच् चैत्र महिना को शुक्ल पक्ष को द्वादशीलाच अचानक पहाट् पहाट् राजवाडा मा नगारा बजन् लग्या.  पुरी जनता राजवाडा को सामने जमन् लगी. थोडो बेरा मा कनिष्ठ अमात्य कचरुमल, राजा तैलादित्य, राणी सयजादेवी अना सारजादेवी, लाहानी राजकन्या अरुनादेवी इनला तोंड-हात बांधस्यानी अना हातकडी लगायस्यानी राजवाडा को ग्यालरी मा उभो करनोमा आयेव्. महाराणी बायजाबाई, मुख्य अमात्यको टुरा सुकारूमल अना मुख्य अमात्य ढेरूमल सामने आया. मुख्य राणी बायजाबाईन् घोषणा करीस का, तैलादित्य, कचरूमल, अरुनादेवी अना दुही लहान राणी इन न कट रचस्यांनी मुख्य राणी बायजाबाई व मोठी राजकन्या सुरेखादेवी इनला गयेव रातमा जीवलका मारन को प्रयत्न करीन. पन मुख्य अमात्यको शूरवीर पुत्र सुकारूमल अना मुख्य अमात्य ढेरूमल इन न बडो हिंमतलका उनको कट तोडस्यारी सप्पाई राजद्रोहीनला अटक करीन्. आता चैत्र पौर्णिमा ला राजकन्या सुरेखादेवी को मुख्य अमात्यको शूरवीर पुत्र सुकारूमल संग् बिह्या होये अना वोनच दिवस राज्यभिषेक बी होये.
        सब जनता न 'राजा सुकारूमल की जय' को नारा लगाईन् अना महाराणी बायजाबाई ला राजमाता को दर्जा प्रदान करीन.
-------------------------------------------------------------------

मराठी मध्ये अनुवाद-----  
 • राजकन्या सुरेखा, अरुणा आणि अमात्य-पुत्र..
-------------------------------------------------------------------
        राजा तैलादित्य हा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याचे राज्य फक्त सत्तावीस गावापुरतेच होते, त्यामुळे इतिहासात त्याची नोंद दिसून येत नाही. राजा तैलादित्य ला तत्कालीन रिवाजाप्रमाणे तीन प्रमुख राण्या होत्या. बायजादेवी, सयजादेवी आणि सारजादेवी. शिवाय बिन-लग्नाच्या काही बायका व दासी होत्याच राणीवशात. पहिल्या राणीला, बायजादेवीला दोन्ही कन्याच होत्या. त्यांची नावे अनुक्रमे सुरेखादेवी आणि अरुणादेवी. उर्वरित दोन्ही राण्यांना औलाद नव्हती. राजवैद्याने सारे औषधोपचार व राजपुरोहिताने सर्व प्रकारचे नवसादि-पूजापाठ करूनही ह्या दोन्ही राण्यांना काही अपत्य-लाभ होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे मोठ्या राणीचा वचक जरा जास्तच होता. जरी राजा तैलादित्य नंतर राजगद्दीवर बसणारा राजपुत्र नसला तरी दोन सुस्वरुप व सालस कन्या असल्याने बायजादेवीचे महत्व उर्वरित दोन्ही राण्यांपेक्षा अधिकच होते. 

      तसे पाहिले तर राणीवशातील इतर बिन-लग्नाच्या काही राण्यांना व दासींनाही पुत्रलाभ झालेला होता. पण त्या पुत्रांच्या पिता-निश्चितीबद्दल राजपुरोहितांना काही साधार शंका असल्याने राजा सुद्धा त्या पुत्रांना राजपुत्रांचा दर्जा प्रदान करू शकत नव्हता. तरी त्या पुत्रांपैकी एक पुत्र जो बिन-लग्नाच्या कमळजा नावाच्या राणीचा पुत्र होता, त्याच्या बल, बुद्धी व विद्या यातील प्रावीण्यामुळे त्याला त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच कनिष्ठ अमात्य म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्याने ती जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली सुद्धा होती. झाले असे की, राज्यातील सत्तावीस गावांपैकी एका बरबसपुरा नावाच्या गावातील एका महाजनाने केलेले राजाविरूद्धचे बंड त्या पुत्राने यशस्वीपणे मोडून काढले होते. तेव्हापासून त्या पुत्राचे, (त्याचे नाव कचरुमल) महत्व राजदरबारात वाढू लागले होते.

        कचरुमल चे वाढते महत्त्व मुख्य अमात्य ढेरूमल याला बोचू लागले होते, कारण त्या पुत्राद्वारे पुढे-मागे मुख्य अमात्याला शह देण्याची शक्यता मुख्य अमात्य ओळखून होता. म्हणूनच ढेरूमलने हळूहळू राणी बायजाबाईचे कान भरायला सुरूवात केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, बायजाबाईच्या दोन्ही कन्या सुरेखादेवी व अरुणादेवी यांनी राजदरबारातील आपला वावर व अस्तित्व वाढवला होता. राजकन्या अरुणादेवी जरा जास्तच हस्तक्षेप करायची. त्या राजकन्यांचा राजदरबारातील व राज्यकारभारातील वाढता वावर व अस्तित्व-जाणीव पाहून राजा तैलादित्य मात्र मनोमन सुखावत/सुखावला होता. मुख्य अमात्य ढेरूमलच्या कारस्थानाची उकल मात्र राजा तैलादित्य करू शकला नव्हता.

      अशातच एके दिवशी राजा तैलादित्य महाराणी बायजादेवीच्या महालात रमत असताना मुख्य अमात्य ढेरूमल तेथे परवानगी घेऊन प्रवेशता झाला. व अमात्याने कल्पना मांडली की, दोन्ही राजकन्या विवाहयोग्य झाल्या असल्याने आता त्यांच्या विवाहाची तजवीज करून सुरेखादेवीसाठी दूरच्या राज्यातून एक समर्पक, सुयोग्य घरजावई आणून त्याला राज्याभिषेक करावा तथा अरुणादेवीला शेजारच्याच एखाद्या राजाच्या सुस्वरूप व बल, बुद्धी, विद्येने प्रशंषित राजपुत्रासह विवाहबंधनात बांधावे. जेणेकरून ह्या राज्याची फाळणी न होता दोन्ही राजकन्यांना आपापले राज्य मिळू शकेल. 

       राजा तैलादित्य व महाराणी बायजादेवी यांना ही अमात्य-कल्पना पसंत पडली. राजाने ताबडतोब दोन्ही राजकन्या व उर्वरित दोन्ही राण्यांना तेथेच बोलावून घेतले आणि अमात्य-कल्पनेची कल्पना सर्वांना दिली. राजकन्या अरुणादेवी जरा नाराज असली तरी काही आढेवेढे, काही विचारविमर्शानंतर मुख्य अमात्याची कल्पना सर्वसंमतीने मान्य करण्यात आली.

     दुस-याच दिवशी राजदरबारात या निर्णयाची घोषणा करण्यात आली व वरसंशोधनाची वगैरे प्रक्रिया सुरू झाली. कनिष्ठ अमात्य कचरुमल वर सुरेखादेवी व अरुणादेवी यांच्यासाठी सुयोग्य वर शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली व येत्या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला विवाह-समारोह पार पाडण्याचे कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आले. राजदरबारात हा निर्णय झाला त्यादिवशी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी होती.

       राजा तैलादित्याच्या आदेशानुसार सर्व आपापल्या कामगिरीवर रुजू झाले. दिवस भराभर सरू लागले. होळी आली व गेली. पळस फूलून गेला. नियोजन पुढे सरकत असल्याचे जाणवत होते. काही-बाही कूजबूज ऐकू यायची पण राजा तैलादित्य व मुख्य अमात्य ढेरूमल त्यातून/त्यावर तोडगा काढत असत.

      अखेर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीलाच अचानक पहाटे पहाटे राजवाड्यात नगारे वाजू लागले. सारी रयत राजवाड्यासमोर जमू लागली. थोड्याच वेळात कनिष्ठ अमात्य कचरुमल, राजा तैलादित्य, राण्या सयजादेवी व सारजादेवी, राजकन्या अरुणादेवी यांना तोंड बांधून व हातकड्या घालून राजवाड्याच्या गॅलरीत उभे करण्यात आले. महाराणी बायजादेवी, राजकन्या सुरेखादेवी, मुख्य अमात्याचा पुत्र सुकारूमल व मुख्य अमात्य ढेरूमल समोर आले. आणि महाराणी बायजादेवीने घोषणा केली की, तैलादित्य, कचरुमल, अरुणादेवी व दोन राण्या यांनी मिळून कट रचला व गेल्या रात्री त्यांनी महाराणी बायजादेवी व ज्येष्ठ राजकन्या सुरेखादेवी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण मुख्य अमात्य ढेरूमल व त्याचा शूरवीर पुत्र सुकारूमल यांनी हा कट वेळीच मोडून काढला. सर्व राजद्रोह्यांना अटक करण्यात आली आहे. आता चैत्र पौर्णिमेला राजकन्या सुरेखादेवीचे अमात्यपुत्र सुकारूमलशी विवाह होईल व सुकारूमलला त्याच दिवशी राज्याभिषेकही करण्यात येईल. 

     सा-या रयतेने "राजा सुकारूमल की जय" असा नारा बुलंद केला आणि महाराणी बायजादेवीला राजमातेचा दर्जा प्रदान केला.
□□□
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(शब्द संख्या सुमारे--2225)
(आभार :- डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे आणि देवेंद्र चौधरी)
¤
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
22:10:19
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment

कृष्ण अना गोपी

मी बी राधा बन जाऊ बंसी बजय्या, रास रचय्या गोकुलको कन्हैया लाडको नटखट नंदलाल देखो माखनचोर नाव से यको!!१!! मधुर तोरो बंसीकी तान भू...