Showing posts with label लखनसिंहजी कटरे यांचे लेख. Show all posts
Showing posts with label लखनसिंहजी कटरे यांचे लेख. Show all posts

Sunday, May 24, 2020

झाडीपट्टी, परमार(पोवारां)चे राज्य आणि राजा भोज : एक टिपण


>> 'विवेकसिंधु' या आद्य मराठी ग्रंथाची रचनाच मुळी झाडीपट्टीतील 'अंभोरा' या तीर्थक्षेत्री झाली. (अंभोरा येथे लहान-मोठ्या पाच नद्यांचा संगम होतो.) विवेकसिंधु मधील झाडीबोलीचा शब्दवापर वरील संशोधनाला पुष्टी देतात. यावर डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी एक संशोधनात्मक ग्रंथ, विवेकसिंधु ची संशोधित प्रत, सिद्ध केला असून तो ग्रंथ अक्षय प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या ग्रंथाच्या नागपूर येथील लोकार्पण सोहळ्यात डाॅ.श्री.पंकज चांदे, डाॅ.श्री.म.रा.जोशी, प्रा.श्री.श्री.मा.कुलकर्णी, प्रा.श्री.राम शेवाळकर यांनी त्यांच्या विद्वत्तापूर्ण व संशोधनमूल्ये असलेल्या भाषणांतून बोरकरांच्या या संशोधन कार्याला अधोरेखित केले आहे. 

>> डाॅ.श्री.म.रा.जोशी यांनी त्यांच्या सविस्तर व संशोधनमूल्ये असलेल्या भाषणांतून नमूद केल्याप्रमाणे, "झाडीमंडळाचा अभ्यास करीत असतांना आणि इतिहास पाहत असतांना 'विवेकसिंधु'च्या संदर्भात काही घटनांचा मागोवा घेणे आवश्यक आहे.  ... 'विवेकसिंधु'च्या लेखनाचा काळ शके 1110 हा आहे. याच शके 1110 मध्ये मध्यप्रदेशात *परमारांचे* राज्य होते. देवगिरीचे सिंघल यादव हे शके 1132 नंतर विदर्भात आलेले आहेत. यवतमाळ आणि अचलपूरपर्यंतच्या प्रदेशाला हेमाद्रीने व सिंघल तथा त्यानंतरच्या राजांनी पुढे आपल्या राज्याला जोडलेला आहे. ती घटना शके 1132 नंतरची आहे. म्हणजेच मुकुंदराजांचा 'विवेकसिंधु' त्या घटनेच्या अगोदर 20--22 वर्षांपूर्वी तयार झालेला होता. त्यावेळी मात्र विदर्भावर *परमारांचे* राज्य होते. परमारांच्या राजवटीत जे ग्रंथ निर्माण झाले आहेत त्यांच्यापैकी दोन ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. ... एक भोजाने लिहिलेला 'शृंगारप्रकाश' हा ग्रंथ आहे आणि दुसरा धनिकाचा 'दशरुपक' हा ग्रंथ आहे. यांच्यापैकी भोजाने आपल्या 'शृंगारप्रकाश' या ग्रंथात विशिष्ट शब्द किंवा संज्ञा वापरल्या आहेत. ... ग्रंथाच्या शब्दांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला 'व्हर्बाटियल इंडेक्स' असे नाव दिले जाते. त्या ग्रंथकाराचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व त्या ग्रंथातील शब्दाशब्दांत प्रकट होत असते. ग्रंथकाराने वापरलेले शब्द, त्या शब्दांचे वजन, त्याची वेगवेगळी अर्थप्रकृती, त्याची वलये, .... हे सारे पाहिल्यानंतर तो ग्रंथकार कोणत्या ताकतीचा आहे हे आपल्या लक्षात येत असते. मुकुंदराज हे त्यांच्यापैकी एक आहेत. ... अशा ग्रंथकारांना आपण 'बीज ग्रंथकार' या नावाने संबोधत असतो. त्यांची शब्दसंपदा अतिशय विलक्षण अशा स्वरुपाची असते. ... जेव्हा 'शृंगारप्रकाश' हा *भोजाचा ग्रंथ वाचनात आला तेव्हा असे दिसून आले की 'गति' हा एक काव्यरचनेचा प्रकार आहे. तात्काळ केलेली काव्यरचना, रसालंकारांनी युक्त अशी काव्यरचना, आशयाने व आकाराने सुटसुटीत अशी काव्यरचना, अशा रचना प्रकाराला 'गति' हे नाव आहे. डाॅ.राघवन यांनी 'शृंगारप्रकाश' या ग्रंथाचे नव्याने संपादन करून ते प्रकाशित केले आहे. त्यात भोजाची ही सर्व वैशिष्ट्ये अगदी स्पष्टपणे त्यांनी दाखवून दिले आहेत. तर 'गति' हा भोजाने वापरलेला शब्द महाराष्ट्रातील आहे; विशेषतः विदर्भातील आहे. परमारांनी विदर्भावर फार मोठ्या प्रमाणावर राज्य केले होते. याशिवाय *परमारांची अनेक घराणीदेखील विदर्भात वसली होती. त्यांचे अनेक लोक होते. भंडारा (आता गोंदिया-भंडारा) जिल्ह्यातील पोवार नावाची जी आजची जमात आहे ती सारी परमारांचीच शाखा होय. ते तिकडून (मालव्यातून?) आलेले आहेत. त्यांच्या चालीरिती जर तपासल्या तर कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो. या परमारांच्या कालखंडात निर्माण झालेले मराठी, संस्कृत किंवा हिंदी ग्रंथ जर तपासले तर मराठीच्या अध्ययनाला त्याचा फार मोठा उपयोग होतो. त्यामुळे आपण एका वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. ....." हा एवढा दीर्घ उतारा उद्घृत कारण हे की, झाडीबोलीचे अध्ययन व संशोधन हे एकूणच वैदर्भीय इतिहासाभ्यासाच्या दृष्टीनेही किती विविधांगी आणि सर्वसमावेशक आहे, याची प्रचिती यावी. आणि पर्यायाने या क्षेत्रात नवनवीन संशोधक, पुरातत्त्ववेत्ते, विद्वान महानुभावांनी शिरकाव करून या भागात दडलेले असंख्य माणिक, मोती, हिरे शोधून काढावेत, अशी स्वाभाविक अपेक्षा आहे. 

संकलक:- @ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 

पोवारी बोली अना मी : एक पुनरावलोकन

>> मी फरवरी 2013 मा रिटायर भयेव् अना कोनतोच शहर मा स्थायी नही होयस्यार आपलो जन्मगाव/खेडेगाव बोरकन्हार मा पुनर्स्थायी होन् साठी मार्च 2013 पासना आमरो गावमा रव्हन् ला आयेव् सपरिवार। 

>> च्यालीस-पैंतालीस साल शिक्षण अना नवकरी को कारन लका बाहेर-बाहेर रव्हेव् होतो मुनस्यारी बचपनकी पोवारी बोली ठीक लका बोलता आवत् नोहोती। अटक-अटकस्यारी बोलत होतो.

>> पर आमरो घर् गावमा एक नवकर होतो, वोको नाव देवाजी रहांगडाले। येन् देवाजीला पोवारी को सिवाय दुसरी कोनतीच भास्या बोलता आवतच् नोहोती। वोकोसंग् पोवारी मा बोलता बोलता मी धीरू धीरू पहलेवानीच धाराप्रवाह पोवारी बोलन् लगेव्। 

>> मी झाडीबोली को चळवळ मा 1979-80 पासना कार्यरत सेव्. झाडीबोली साहित्य मंडळ को संस्थापक/आजीव सभासद भी सेव्. तसोच महाराष्ट्र मा बोली जानेवाली सप्पाई बोलीईनको एक अखिल महाराष्ट्र बोली साहित्य महामंडळ को भी मी संस्थापक/आजीव सभासद सेव्. 

>> येको कारणलका मी पोवारी बोली की एक लहानशी पोस्ट 2014 -15 मा फेसबुक परा सहजच टाक देयेव्. 

>> अना मोला आश्चर्य का धक्का-पर-धक्काच बसन् लग्या. 
करीब हजारेक बिन-पोवार अना काही पोवार लोकईनन् येन् पोवारी बोली ला सिरफ लाईकच नही करीन, मोला अनखी पोस्ट टाकन साठी प्रोत्साहीत भी करीन. बड़ी मिठी, लयदार बोली लग् से मूनस्यारी बिन-पोवार लोकईनन् बड़ी तारीफ करीन. मी त् दंग रह्य् गयेव् येव् रिस्पान्स देखस्यानी! 

>> अना असो मंग मी धीरू-धीरू पोवारी बोली चळवळ संग् जुळ गयेव्.  

>> अजको येन् पोवारी बोली को पुनरुत्थान देखस्यानी एक बोली-अभ्यासक मूनस्यारी मोला बोहुत बोहुत खुशी होय् रही से. मोला भी सबन् आपलो संग् जोड़ लेईन येकोसाठी मी सबको आभारी सेव्.

@ॲड.लखनसिंह कटरे  
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(20.05.2020)

Saturday, April 4, 2020

पोवारी बोली आणि लोकसाहित्य : एक दृष्टिक्षेप.

              फ्लोरिडा (अमेरिका) येथील एक स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक न्याय व अधिकारांकरिता लढणारी एक्टीव्हिस्ट (कार्यकर्ती) एल.आर.नाॅस्ट यांच्या एका प्रसिद्ध कवितेतील काही ओळी अशा आहेत ----
आपलीच कहानी बोलावी 
आपलीच कहानी सांगावी 
स्पष्ट, बुलंद आवाजात 
क्वचित अस्पष्ट बडबडीत सुद्धा ___
पण लिहावीच..., बोलावीच..., सांगावीच...,
आपली कहानी. 
काही स्वनामधन्य समजू शकणार नाहीत 
आमची ही कहानी, 
काही प्रतिष्ठित एखादेवेळी  
करतील अस्वीकार सुद्धा.
तरी काही लोक आहेत अजून 
जे समजू शकतील आमची कहानी,  
मानतील आमचे आभारही.
आणि नंतर घडेल 
एक जादू , एक चमत्कार...
येऊ लागतील मग काही अगम्य आवाज स्वीकाराचे,
काही कुजबुज सुद्धा स्वागताची.
पसरेल आसमंतात मग स्वर  ---
"मला सुद्धा सांगायचंय..., बोलायचंय..., लिहायचंय...,"
आणि मग संगठीत होईल 
तुमचा समाज 
तुमचे आप्तगण 
तुमचा कुळ सुद्धा  ----
तेव्हा तुम्ही उमजून जाल 
की
तुम्ही आता एकटे-दुकटे राहिला नाहीत !
     पोवार/पवार/पँवार समाज आणि त्यांची पोवारी/पवारी/पँवारी बोली सुद्धा वरील कवितेत नमूद वस्तुस्थितीप्रमाणेच आज अव्यक्त स्वरूपात लोकसाहित्याच्या एका कोप-यात दडलेलीच असून या बोलीच्या "बोलकां"ना एल.आर.नाॅस्ट सारख्या एखाद्या कवीच्या/प्रोत्साहकाच्या प्रोत्साहनपर मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. वस्तूतः पोवारी बोली ही खूप प्राचीन बोली असून इंग्रज भाषाविदांनी सुद्धा या बोलीच्या प्राचीनतेची ग्वाही दिलेली आहे. डाॅ.गणेश देवी यांच्या "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण" या प्रकल्पांतर्गत पद्मगंधा प्रकाशन, पुणे द्वारा प्रकाशित "महाराष्ट्र" या खंडात महाराष्ट्रातील एकूण 60 बोलीभाषांची प्राथमिक माहिती देऊन त्यांची ओळख करून देण्यात आली आहे. या 60 बोलीभाषांच्या यादीत 9व्या क्रमांकावर पोवारी बोलीभाषेची अकरा पृृष्ठांमध्ये नोंद घेण्यात आली आहे. या नोंदी काहीशा फसव्या, भ्रामक, त्रुटीपूर्ण, इतिहासाच्या एकांगी व इतिहासाचे विकृत/भ्रमित आकलन असलेल्या अशा असल्या तरी पोवारी बोलीभाषेची नोंद एका विश्वस्तरीय शोध-प्रकल्पात झाली याचे अल्पसे समाधान आहे. (या नोंदींच्या यथायोग्य दुरुस्तीसाठी मी डाॅ.गणेश देवी यांच्यासोबत पत्रव्यवहार केल्यावर त्यांनी त्यातील चूक अप्रत्यक्षरित्या कबूल केली असून पुढील आवृत्तीमध्ये ह्या चुकांची दुरूस्ती करण्यात येईल असे मला त्यांनी कळविले आहे. त्यावर माझा सतत पाठपुरावा सुरू आहे.)  

      परंतु ह्या बोलीला स्वतःची स्वतंत्र अशी वेगळी लिपी नसल्याने ही बोली लिपीबद्ध मात्र होऊ शकलेली नाही. आदिवासी समाजाच्या बोलींसारखीच ही बोली सुद्धा फक्त बोलचालीत, लोकगीतात, लोकसाहित्यातच वाचिक/मौखिक व अप्रकाशित स्वरूपातच दडून राहिलेली आहे. परंतु गेल्या सुमारे 40-50 वर्षांच्या पोवार-समाज-जागृतीच्या चळवळीने ह्या बोलीला देवनागरी लिपीत लिपीबद्ध करायला प्रारंभ करून दिला आहे. जयपालसिंह पटले, डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे,.. सारख्या आज पंच्याहत्तरी पार केलेल्या/तथा एडव्होकेट मनराज पटले या दिवंगत झालेल्या समाज धूरीणांनी या बोलीला देवनागरीचा शिरेटोप चढवला असून आता लखनसिंह कटरे, देवेंद्र चौधरी, डाॅ.शेखराम येळेकर, रणदीप बिसने, पालिकचंद बिसने, तुफानसिंह पारधी, वाय.सी.चौधरी, आशिष अंबुले, देवेंद्र वासुदेव रहांगडाले, देवेंद्र (बंटी) रहांगडाले, वर्षा पटले-रहांगडाले, हिरदीलालजी ठाकरे, महेंद्रकुमार रहांगडाले, महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले, चिरंजीव बिसेन, ...... इत्यादी सुमारे 50-60 पोवारी-बोली साहित्यिक देवनागरी लिपीत पोवारी बोलीला आधुनिक कविता, कथा, लेखादींच्या रुपात लिपीबद्ध करीत आहेत. यवतमाळ येथे 2019 ला संपन्न झालेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, इतिहासात प्रथमच, पोवारी बोलीतील कविता सादर करण्याचा मान, पोवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळाचे सचिव श्री.देवेंद्र चौधरी यांना मिळाला आणि पोवारी बोलीला एका मोठ्या/अखिल भारतीय स्तरावरील व्यासपीठावरून व्यक्त होता आले. 

     असे असले तरी गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तथा बालाघाट, छिंदवाडा, शिवनी, बैतुल या मध्यप्रदेशातील जिल्ह्यांत गावागावात वसलेल्या पोवार समाजाच्या महिलांकडे (काही पुरुषांकडे सुद्धा) असलेला लोकगीते आणि इतर लोकसाहित्याचा खजिना अजून पूर्णत्वाने लिपीबद्ध व्हायचा आहे. हा संपूर्ण खजिना मौखिक रुपात पोवारी-महिला/पुरुषांच्या कंठात आणि मना-हृदयातच दडून आहे. या संदर्भात गेल्या 03 नोव्हेंबर 2018 ला "पोवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळा"ची स्थापना करण्यात आली असून दि.03 फेब्रुवारी  मार्च 2019 ला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा या तालुकास्थळी पहिले एक दिवसीय अखिल भारतीय पोवारी बोली/भाषा साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न करण्यात आले. या संमेलनातील संपूर्ण कामकाज फक्त पोवारी बोलीभाषेतच पार पाडले जातात. 

    कोणतीही बोली आणि त्या बोलीभाषेतील लोकसाहित्य हे ॲकेडेमिक, घडवलेल्या बोनसाय वृक्षांसारखे एखाद्या राजपथावरील शोभादालनांसम नसते, तर ते यापेक्षा वेगळ्या अशा उबडखाबड भूमी, पठार, पहाडांवर अस्ताव्यस्त रुपात वाढलेल्या व लालभडक अग्निसंभार सांभाळून, पायपथासम जनपथाची शोभा वाढवत उभे असणा-या पलाशवृक्षांसारखे असते. आणि पोवारी बोलीभाषेतील लोकसाहित्य सुद्धा याला अपवाद नाहीच. असा हा ऐतिहासिक दस्तावेज लिखित व प्रकाशित स्वरूपात अभ्यासकांपुढे संशोधनासाठी ठेवणे अनिवार्यपणे आवश्यक ठरते. परंतु पोवारी बोलीतील लोकसाहित्याच्या अशा प्रकाशनाची पुरेपूर व्यवस्था अजून तरी मोठ्या प्रमाणात झालेली नाही, हे खरे आहे. 

    त्यातल्या त्यात डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी त्यांच्या "पोवारी/पवारी ज्ञानदीप" या लघु-शोध-ग्रंथात काही पोवारी लोकगीते व लोकसाहित्य संकलित करून प्रकाशित करण्याच्या महत्कार्याला यशस्वी हातभार लावला आहे. मुख्यतः लिखित आणि प्रकाशित साहित्यावरच कोणत्याही भाषेच्या अस्तित्व व महत्वाचे आकलन व तिचा अभ्यास शक्य असल्याने या वाचिक/मौखिक व अप्रकाशित स्वरूपात दडून असलेल्या पोवारी लोकगीतांना व इतर लोकसाहित्याला लिखित व प्रकाशित स्वरूपात आणण्यासाठी पोवारी साहित्य कला संस्कृती मंडळ प्राथम्याने कार्यरत झाले आहे.

    एक हिंदी भाषाशास्त्री डाॅ.मंजू अवस्थी (D.Lit.) यांनी त्यांच्या भाषा-बोली विषयक संशोधनात पोवारी बोलीच्या संशोधनदरम्यान असे विधान केले आहे की, जगातील कोणत्याही बोली/भाषेतील पहिले लोकगीत हे पोवारी/पँवारी/पवारी बोलीतील आहे. 

     अशा या प्राचीनतम अशा पोवारी/पँवारी/पवारी बोली/भाषेतील दोन लोकगीत व एक लोककथा, त्यांच्या मराठी भावानुवादासह, उदाहरणादाखल खाली देत आहे. 

१) विवाह गीत -
------------------
लग्नप्रसंगी मंडप सुताई दस्तूराचे वेळी गाईले जाणारे गीत-

बारा डेरी को मांडो गळी से ||धृ॰||

मांडो पर मंडाईन चला बेरू 
बेरूईन पर बिछाईन जांभूर की डारी 
जांभूर को डारी खाल्या शोभसे आंबा की तोरन ||१||

जवाई रामलाल मांडो सूत से 
सूत गोईता जवाई बापू तुमरो सेला घोरऽ से 
तोरन गोईता जवाई बापू तुमरो कास्टोऽ सुटसे ||२||

कुकू मा डोईता, सीता वो बाई 
तुमरी अंगोरी लाल भई से 
मांडो मा तोरन लगी से ||३||

(भावानुवाद :- बारा लाकडी खांबाचा मांडव उभारला आहे. मांडवावर ओले बास/वेळू, बासांवर जांभळाच्या  फांद्या आणि मांडवाखाली आंब्याचा पानाचे तोरण लावले आहे. 
जावई रामलाल (रामाचे लोक-नाव) मांडवाभोवती सुत गुंडाळतो आहे. त्यावेळी जावई बापूंचा शेला जमीनीवर सरपटतो आहे, जावयाचा कास्टा (धोतराचा कास्टा) सुटत आहे.
रामलालची पत्नी, त्याघरची लेक, सीता, (जावयाकडून) आपल्या डोईवर कुंकू लावून घेत आहे, त्यामुळे जावयाचे/तिचे बोट लाल झाले आहे. आणि मांडवाखाली तोरण लागली आहे.)

२)जात्यावरील गीत -
---------------------------
दरन मी दरूसू 
~~~~~~~~~
दरन मी दरूसू गा बाई, दरूसू पाच दाना 
मोरो माहेर को कारखाना ||

दरन मी दरूसू गा बाई, जानू पह्यले माता पिता 
मंग जानू मी राम सीता ||

दरन मी दरूसू गा बाई, दरूसू च्यार गहू 
राज करजो मोरो भाऊ ||

दरन मी दरूसू गा बाई, दरूसू कनकी पीठ 
मोरो माहेर को मुंग्या जोट ||

पंढरपूर की विठ्ठल रूखमाई 
रूखमाई से आंगन मा 
पानी भर् से रांजन मा 

दूर ल् आरखू मी मोरो भाई की चाल 
डावो हातमा दिस् से, झोरा लाल लाल ||
(संकलन - सतनबाई चौधरी, तोतलाडोह, जि.नागपूर)

भावानुवाद :- मी दळण दळते, पाच दाणे, माझ्या माहेरी मात्र 'कारखाना' आहे. दळण दळताना मला प्रथम आठवतात, माझे मायबाप आणि त्यानंतर राम सीता. मी चार दाणे गहू दळते, माझा भाऊ राज करेल. मी कणिक, पीठ दळते, माझ्या माहेरी मात्र मुंग्याही खातात (कणिक/पीठ). पंढरपूरातील विठ्ठलाची रूखमाई विठ्ठलासोबत माझ्या आंगणात आली आहे, ती रांजनात पाणी भरत आहे. मी दुरूनच माझ्या भावाच्या पावलांची चाहूल ओळखते, त्याच्या डाव्या हातात मला लाल रंगाचा थैला दिसतोय.
°°°
यानंतर एक उदाहरण पोवारी/पँवारी/पवारी लोककथा-सदृश्य अर्वाचीन कथेचे पाहू या -----

• राजकन्या सुरेखा, अरुना अना अमात्य-पुत्र...
-------------------------------------------------------------------
       राजा तैलादित्य येव एक महापराक्रमी राजा भय् गयेव. वोको राज्य सिरीफ सत्ताईस गावपुरतोच होतो, वोन कारन लका इतिहासमा वोकी नोंद दिस् नही. राजा तैलादित्य ला वोन समयको रिवाजापरमाटी तीन प्रमुख रानी होती. बायजादेवी, सयजादेवी आणि सारजादेवी. येको अलावा बिन-बिह्या की अनखी काही नारी अना दासी होतीच राणीवसामा. पयलो राणीला, बायजादेवीला दुय टूरी च होती. उनको नाव सुरेखादेवी अना अरुनादेवी. बाकी की दुय रानीहिनला औलाद नोहोती. राजबैैदन् बोहूत दवाई पानी करीस अना राजपुरोहितन् सब प्रकारको नवसादि-पूजापाठभी कराईस. पर वोन दुय रानीहीनला संतान को फायदा नही भयेव होतो. वय् दुुुही बिना-संतानच रही. वोको कारन लका मोठो रानी को वचक जरा जास्तीच होतो. राजा तैलादित्य को राजगद्दीवर बसनारो राजपुत्र नोहोतो तरी दुय सुंदर-सुंदर अना हुशार टूरी रहेवलका बायजादेवी को महत्व बाकी को दुय रानीपेक्ष्या जरा जास्तीच होतो.

      तसो देखीस त् राणीवसामाकी बिन-बिह्या की काही नारी अना दासीहीनला टूरुपोटू भया होता. पर वोन टूरुपोटू को खरो बाप को बारा मा राजा अना राजपुरोहितलाभी जरा शंकाच होती. असी साधार शंका रहेवलका राजाभी वोन टूराहीन ला राजपुत्र को दर्जा देय नही शकत होतो. तरी वोन टुराहीनपैकी एक टुरा जो बिन-बिह्या को  कमलजा नावको नारी को टुरा  होतो, वोको बल, बुद्धी व विद्या को प्रावीण्यलका वोला वोको उमर को सोरा साल माच् लहानो/कनिष्ठ अमात्य की जबाबदारी देनोमा आयी होती. वोन वा जबाबदारी बहुत चांगलो हिसाबलका संभालीभी होतीस. भयेव असो का, राज्य को सत्तावीस गावपैकी एक बरबसपुरा नावको गावको एक महाजनन राजा को खिलाफ बंड करी होतीस. तब् वोन टुरान् वू बंड मोडस्यानी काढी होतीस. तबपासना वोन टुरा को, (वोको नाव कचरुमल) महत्व राजदरबार मा बढन् लगेव् होतो. 
        कचरुमल को बढतो महत्त्व मुख्य अमात्य ढेरूमलला जरा टोचन् लगेव् होतो. काहे का भविष्य मा मंग्-पुढ् मुख्य अमात्य की जागा वोला मिल सकसे या बात मुख्य अमात्यला खटकत होती. मूनस्यार अमात्य ढेरूमलन् धीरू धीरू मोठी रानी बायजाबाई का कान भरनला सुरूवात करी होतीस. वोको परिनाम असो भयेव का, बायजाबाई की दुयी टूरी  सुरेखादेवी अना अरुनादेवी इन न राजदरबारमाको आपलो आवनो-जावनो अना अस्तित्व बढावनो सुरू करीन. लाहानी राजकन्या अरुनादेवी जरा जास्तच हस्तक्षेप करत होती. वोन राजकन्याको राजदरबारमाको अना राज्यकारभारमाको  बढतो आवनो-जावनो अना हस्तक्षेप देखस्यार राजा तैलादित्य मात्र मनको मनमा खुश/हर्षित होत होतो. येन् खुशीमा मुख्य अमात्य ढेरूमलको छुपेव् कारस्थानाकी उकल राजा तैलादित्यला करताच नही आयी.

      असोमाच् एक दिवस राजा तैलादित्य महारानी बायजादेवीको  महलमा रवतानीच् मुख्य अमात्य ढेरूमलन  परवानगी लका महलमा प्रवेश करीस अना राजाला याद कराय् देईस का आता दुही राजकन्या बिह्या लायक भयी सेती. वोको कारन आता उनको बिह्या की तजवीज करे पायजे. मोठी राजकन्या सुरेखादेवी लायीक दुसरो राज्य मालका एक सोयस्कर घरजवाई आनस्यानी वोको राज्यभिषेक करन को अना अरुनादेवी साठी जवर को राज्य को एखाद् राजा को चांगलो रूप, शक्ती, बुद्धी, विद्यालका प्रवीन राजपुत्रको संग् बिह्या कर देनको. वोकोलका राज्य की विभागनी नही होनकी अना दुही राज्यकन्याहीनला आपआपलो राज्य भेट सके.

     दुसरो दिवस राजदरबार मा येन निर्णय को घोषणा करनो मा आयी अना नवरदेव देखन की तयारी सुरू भयी.  कनिष्ठ/लहानो अमात्य कचरूमल पर सुरेखादेवी अना अरुणादेवी इनको साठी चांगला टुरा धूंडन की जवाबदारी सोपी गयी. अना चैत्र महिना को पोर्णिमाला बिह्या की आखनी को कार्यक्रम तयार करनोमा आयेव्. राजदरबार मा येव् निर्णय घोषित भयेव् वोन दिवस फागून महिना को शुक्ल पक्ष की पंचमी होती.
       राजा तैलादित्यको आदेशनुसार सब आपापलो कामगिरीमा रुजू भया. दिवस भराभर खतम होन लग्या. होरी आयी ना गयी. परसा फुलाय गयेव्. मुुुहुुरत जवर आवन् लगेेव्. असोमाच् काहीतरी गडबड होय रही से, असो लगन् लगेव्. काही-बाही कूजबूज आयकू आवत होती पन राजा तैलादित्य अना मुख्य अमात्य ढेरूमल शांत चित्तलका वोकोमालका /वोकोपरा उपाय काहाळ् लेयेत् असो लगत् होतो.

       पर बीचमाच् चैत्र महिना को शुक्ल पक्ष को द्वादशीलाच अचानक पहाट् पहाट् राजवाडा मा नगारा बजन् लग्या.  पुरी जनता राजवाडा को सामने जमन् लगी. थोडो बेरा मा कनिष्ठ अमात्य कचरुमल, राजा तैलादित्य, राणी सयजादेवी अना सारजादेवी, लाहानी राजकन्या अरुनादेवी इनला तोंड-हात बांधस्यानी अना हातकडी लगायस्यानी राजवाडा को ग्यालरी मा उभो करनोमा आयेव्. महाराणी बायजाबाई, मुख्य अमात्यको टुरा सुकारूमल अना मुख्य अमात्य ढेरूमल सामने आया. मुख्य राणी बायजाबाईन् घोषणा करीस का, तैलादित्य, कचरूमल, अरुनादेवी अना दुही लहान राणी इन न कट रचस्यांनी मुख्य राणी बायजाबाई व मोठी राजकन्या सुरेखादेवी इनला गयेव रातमा जीवलका मारन को प्रयत्न करीन. पन मुख्य अमात्यको शूरवीर पुत्र सुकारूमल अना मुख्य अमात्य ढेरूमल इन न बडो हिंमतलका उनको कट तोडस्यारी सप्पाई राजद्रोहीनला अटक करीन्. आता चैत्र पौर्णिमा ला राजकन्या सुरेखादेवी को मुख्य अमात्यको शूरवीर पुत्र सुकारूमल संग् बिह्या होये अना वोनच दिवस राज्यभिषेक बी होये.
        सब जनता न 'राजा सुकारूमल की जय' को नारा लगाईन् अना महाराणी बायजाबाई ला राजमाता को दर्जा प्रदान करीन.
-------------------------------------------------------------------

मराठी मध्ये अनुवाद-----  
 • राजकन्या सुरेखा, अरुणा आणि अमात्य-पुत्र..
-------------------------------------------------------------------
        राजा तैलादित्य हा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याचे राज्य फक्त सत्तावीस गावापुरतेच होते, त्यामुळे इतिहासात त्याची नोंद दिसून येत नाही. राजा तैलादित्य ला तत्कालीन रिवाजाप्रमाणे तीन प्रमुख राण्या होत्या. बायजादेवी, सयजादेवी आणि सारजादेवी. शिवाय बिन-लग्नाच्या काही बायका व दासी होत्याच राणीवशात. पहिल्या राणीला, बायजादेवीला दोन्ही कन्याच होत्या. त्यांची नावे अनुक्रमे सुरेखादेवी आणि अरुणादेवी. उर्वरित दोन्ही राण्यांना औलाद नव्हती. राजवैद्याने सारे औषधोपचार व राजपुरोहिताने सर्व प्रकारचे नवसादि-पूजापाठ करूनही ह्या दोन्ही राण्यांना काही अपत्य-लाभ होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे मोठ्या राणीचा वचक जरा जास्तच होता. जरी राजा तैलादित्य नंतर राजगद्दीवर बसणारा राजपुत्र नसला तरी दोन सुस्वरुप व सालस कन्या असल्याने बायजादेवीचे महत्व उर्वरित दोन्ही राण्यांपेक्षा अधिकच होते. 

      तसे पाहिले तर राणीवशातील इतर बिन-लग्नाच्या काही राण्यांना व दासींनाही पुत्रलाभ झालेला होता. पण त्या पुत्रांच्या पिता-निश्चितीबद्दल राजपुरोहितांना काही साधार शंका असल्याने राजा सुद्धा त्या पुत्रांना राजपुत्रांचा दर्जा प्रदान करू शकत नव्हता. तरी त्या पुत्रांपैकी एक पुत्र जो बिन-लग्नाच्या कमळजा नावाच्या राणीचा पुत्र होता, त्याच्या बल, बुद्धी व विद्या यातील प्रावीण्यामुळे त्याला त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच कनिष्ठ अमात्य म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्याने ती जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली सुद्धा होती. झाले असे की, राज्यातील सत्तावीस गावांपैकी एका बरबसपुरा नावाच्या गावातील एका महाजनाने केलेले राजाविरूद्धचे बंड त्या पुत्राने यशस्वीपणे मोडून काढले होते. तेव्हापासून त्या पुत्राचे, (त्याचे नाव कचरुमल) महत्व राजदरबारात वाढू लागले होते.

        कचरुमल चे वाढते महत्त्व मुख्य अमात्य ढेरूमल याला बोचू लागले होते, कारण त्या पुत्राद्वारे पुढे-मागे मुख्य अमात्याला शह देण्याची शक्यता मुख्य अमात्य ओळखून होता. म्हणूनच ढेरूमलने हळूहळू राणी बायजाबाईचे कान भरायला सुरूवात केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, बायजाबाईच्या दोन्ही कन्या सुरेखादेवी व अरुणादेवी यांनी राजदरबारातील आपला वावर व अस्तित्व वाढवला होता. राजकन्या अरुणादेवी जरा जास्तच हस्तक्षेप करायची. त्या राजकन्यांचा राजदरबारातील व राज्यकारभारातील वाढता वावर व अस्तित्व-जाणीव पाहून राजा तैलादित्य मात्र मनोमन सुखावत/सुखावला होता. मुख्य अमात्य ढेरूमलच्या कारस्थानाची उकल मात्र राजा तैलादित्य करू शकला नव्हता.

      अशातच एके दिवशी राजा तैलादित्य महाराणी बायजादेवीच्या महालात रमत असताना मुख्य अमात्य ढेरूमल तेथे परवानगी घेऊन प्रवेशता झाला. व अमात्याने कल्पना मांडली की, दोन्ही राजकन्या विवाहयोग्य झाल्या असल्याने आता त्यांच्या विवाहाची तजवीज करून सुरेखादेवीसाठी दूरच्या राज्यातून एक समर्पक, सुयोग्य घरजावई आणून त्याला राज्याभिषेक करावा तथा अरुणादेवीला शेजारच्याच एखाद्या राजाच्या सुस्वरूप व बल, बुद्धी, विद्येने प्रशंषित राजपुत्रासह विवाहबंधनात बांधावे. जेणेकरून ह्या राज्याची फाळणी न होता दोन्ही राजकन्यांना आपापले राज्य मिळू शकेल. 

       राजा तैलादित्य व महाराणी बायजादेवी यांना ही अमात्य-कल्पना पसंत पडली. राजाने ताबडतोब दोन्ही राजकन्या व उर्वरित दोन्ही राण्यांना तेथेच बोलावून घेतले आणि अमात्य-कल्पनेची कल्पना सर्वांना दिली. राजकन्या अरुणादेवी जरा नाराज असली तरी काही आढेवेढे, काही विचारविमर्शानंतर मुख्य अमात्याची कल्पना सर्वसंमतीने मान्य करण्यात आली.

     दुस-याच दिवशी राजदरबारात या निर्णयाची घोषणा करण्यात आली व वरसंशोधनाची वगैरे प्रक्रिया सुरू झाली. कनिष्ठ अमात्य कचरुमल वर सुरेखादेवी व अरुणादेवी यांच्यासाठी सुयोग्य वर शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली व येत्या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला विवाह-समारोह पार पाडण्याचे कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आले. राजदरबारात हा निर्णय झाला त्यादिवशी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी होती.

       राजा तैलादित्याच्या आदेशानुसार सर्व आपापल्या कामगिरीवर रुजू झाले. दिवस भराभर सरू लागले. होळी आली व गेली. पळस फूलून गेला. नियोजन पुढे सरकत असल्याचे जाणवत होते. काही-बाही कूजबूज ऐकू यायची पण राजा तैलादित्य व मुख्य अमात्य ढेरूमल त्यातून/त्यावर तोडगा काढत असत.

      अखेर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीलाच अचानक पहाटे पहाटे राजवाड्यात नगारे वाजू लागले. सारी रयत राजवाड्यासमोर जमू लागली. थोड्याच वेळात कनिष्ठ अमात्य कचरुमल, राजा तैलादित्य, राण्या सयजादेवी व सारजादेवी, राजकन्या अरुणादेवी यांना तोंड बांधून व हातकड्या घालून राजवाड्याच्या गॅलरीत उभे करण्यात आले. महाराणी बायजादेवी, राजकन्या सुरेखादेवी, मुख्य अमात्याचा पुत्र सुकारूमल व मुख्य अमात्य ढेरूमल समोर आले. आणि महाराणी बायजादेवीने घोषणा केली की, तैलादित्य, कचरुमल, अरुणादेवी व दोन राण्या यांनी मिळून कट रचला व गेल्या रात्री त्यांनी महाराणी बायजादेवी व ज्येष्ठ राजकन्या सुरेखादेवी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण मुख्य अमात्य ढेरूमल व त्याचा शूरवीर पुत्र सुकारूमल यांनी हा कट वेळीच मोडून काढला. सर्व राजद्रोह्यांना अटक करण्यात आली आहे. आता चैत्र पौर्णिमेला राजकन्या सुरेखादेवीचे अमात्यपुत्र सुकारूमलशी विवाह होईल व सुकारूमलला त्याच दिवशी राज्याभिषेकही करण्यात येईल. 

     सा-या रयतेने "राजा सुकारूमल की जय" असा नारा बुलंद केला आणि महाराणी बायजादेवीला राजमातेचा दर्जा प्रदान केला.
□□□
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(शब्द संख्या सुमारे--2225)
(आभार :- डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे आणि देवेंद्र चौधरी)
¤
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
22:10:19
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव

               मुख्यतः मध्यप्रदेश, महाराष्ट्र(विदर्भ), राजस्थान या भागात वसलेल्या अल्पसंख्य पोवार/पवार समाजाबद्दल इतर समाज बांधवात भरपूर गैर व भ्रामक समज आहेत. या पोवार समाजाची आपली एक वेगळीच बोलीभाषा असून तिला पोवारी/पवारी/पंवारी बोली या नावाने ओळखले जाते. ही बोली अजूनही ध्वनीनिष्ठ/ध्वनीबद्धच असून आता हळूहळू तिला लिपीनिष्ठ/लिपीबद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

      महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गोंदिया, भंडारा, तथा अंशतः नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात पोवार समाज मुख्यतः नद्यांच्या सान्निध्यात वसलेला आढळून येतो.

      पोवार समाजाची पोवारी बोली सध्या लुप्तप्राय होत असल्याचे आढळून येते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने मूळ शेती व्यवसायातून हा समाज काहीसा तुटत शहरवासी होऊ लागल्याने व आपली पोवारी बोली बोलायला संकोच वाटत असल्याने शहरवासी झालेल्या पोवार समाजातून पोवारी बोली हळूहळू हद्दपार होत चालली आहे. म्हणजे ही बोली टिकविण्याची मुख्य जबाबदारी ज्यांनी उचलणे आवश्यक होते, तेच शिक्षित कुटूंब या बोलीपासून दूर जात असल्याची दुर्दैवी बाब लक्षात आल्यावर तिच्या संरक्षण, विकासाची चिंता काही अभ्यासकांना जाणवू लागली. आणि अशा अभ्यासकांनी स्वतः पुढाकार घेऊन पोवारी बोली विषयक न्यूनगंड दूर करण्यासाठी प्रयत्न आरंभिले. अशा अभ्यासकांमध्ये जयपालसिंह पटले, डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे सारख्या नागपूर निवासी झालेल्या मूळ ग्रामवासींचा प्रामुख्याने समावेश आहे. 

       भाषा ही सर्व प्रकारच्या विकासाला कारणीभूत असते. कोणत्याही समाजाची बोली-भाषा ही त्या समाजाच्या इतिहास, संस्कृती, रिती-रिवाज, पर्यावरण, समाजकारण,  यांची प्रत्यक्ष वाहक व साक्ष असते. पर्यायाने आजच्या या युगात आपापल्या "मूळाकडे पाहण्याच्या" दृष्टीने बोलीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आल्याने तिच्या अस्तित्वरक्षणासाठी व संवर्धनासाठी जागरूक समाज-मन व जन सज्ज झाले/होत आहेत.   

        भारतीय अर्थकारण, राजकारण, समाजकारण, साहित्यकारण, विचारपद्धती व ग्राहक व्यवस्थेवर सकारात्मक/नकारात्मक असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम आणि प्रभाव पाडणा-या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)च्या प्रभावाला व अस्तित्वाला कोणालाही नाकारता येत नाही/येणार नाही. तथापि १९९१ नंतरच्या या संथ बदलाचे परिणाम व प्रभाव प्रारंभी "विशेष न जाणवणारे" असे राहिल्याने सुमारे २000 पर्यंत या बदलांची विशेष अशी दखल साहित्य क्षेत्रात व पर्यायाने भाषा व बोली क्षेत्रात प्रामुख्याने घेण्यात आल्याचे दिसत नाही. परंतु २००० नंतर हे बदल प्रत्येक भारतीयाच्या अंगावर, मनावर, इच्छेवर, विचारपद्धतीवर अगदी जोमाने आदळू लागल्यावर त्याचा प्रभाव व परिणाम प्रत्येकच भारतीय भाषेतील साहित्यावर जाणवू लागला. अशा या संक्रमण अवस्थेत बोलींचे भवितव्य काय, हा प्रश्न प्रत्येक बोली-बोलकां*ना भेडसावू लागला. कारण कोणतीही बोली ही फक्त संभाषण, संप्रेषण, कम्युनिकेशन पुरतीच मर्यादित नसून तिच्याद्वारे त्या-त्या बोली-बोलकांच्या सांस्कृतिक, आनुवंशिक, सामाजिक इतिहासाचे रक्षण व संवर्धन सुद्धा होत असते/झाले असते. त्यामुळे त्या-त्या बोली-बोलकांना आपापली बोली टिकविणे व तिचे संवर्धन करून तिचे लिखित स्वरूपात जतन करणे आवश्यक व अनिवार्य वाटू लागले. अगदी अशीच स्थिती पोवारी/पवारी/पंवारी बोलीच्या बोली-बोलकांना सुद्धा भेडसावू लागली व या बोलीच्या संवर्धन, विकसन, लेखन(लिपीबद्ध), संकलनासाठी पोवारी-बोली-बोलक जागृत झाले. 

         अशातच या इतिहास-प्रसिद्ध पोवारी/पवारी/पंवारी बोलीच्या "नावा"बद्दल काही भ्रम सुद्धा उद्भवू लागले. वस्तूतः महाराष्ट्रात या बोलीवर मराठी, झाडीबोली, गोंडीबोली यांच्या संगतीचा स्वाभाविक अभिसरण होऊन तिला "पोवारी" असे नाव पडले तर मध्यप्रदेशात हिंदीच्या संगतीने तिला "पवारी/पंवारी" असे नाव पडले. एकंदरीत या बोलीच्या "नावा"वर "संगतीचा परिणाम"(?) व्हायचा तो झालाच. सारांशाने म्हणावयाचे म्हणजे पोवारी/पवारी/पंवारी ही नावे स्थलभेदामुळे वेगळी-वेगळी वाटत(?) असली तरी ती एकाच बोलीची "नावे" आहेत, हे स्पष्ट व्हावे. 

        महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा व काहीसा चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत तथा नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा तसेच वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातील काही मोठ्या गावांमध्ये पोवार मालगुजार व पाटील असल्याने त्या-त्या गावात दुस-या समाजातील लोकं सुद्धा पोवारी बोलीचा सर्रास वापर करीत असत/करतात, असे आढळून येते. अशीच वस्तुस्थिती मध्यप्रदेशातील बालाघाट, शिवनी, छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यातही पहावयास मिळते. म्हणजेच पोवारी बोली ही फक्त पोवार समाजापूरती मर्यादित न राहता पोवार-बाहुल्य गावातून पोवारी बोलीला लोक-बोलीचे रूपही मिळाले होते/आहे, असेही आढळून येते. 

     या ऐतिहासिक पोवारीबोलीचा उगम/उद्गम कसा झाला याचे निदान संशोधक करतीलच, तसे संशोधन सुरू सुद्धा आहे. वास्तविक रित्या कोणतीही बोली ही "ध्वनीनिष्ठ" असते तर प्रमाण भाषा ही "लिपीनिष्ठ" असते. आणि त्यामुळेच बोलींना जेव्हा जेव्हा लिपीबद्ध करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा 'लिपीची मर्यादा' त्यासाठी अडसर ठरू लागते व बोलीचा इतिहास शोधणे दुष्कर होऊन बसते. या बोली आणि प्रमाण भाषा यांच्या आंतरसंबंधाबद्दल एक जागतिक किर्तीचे तत्वज्ञ, भाषाशास्त्री श्री.गणेश देवी म्हणतात की, "प्राचीन काळी संस्कृत भाषेत 'व्याख्या' या शब्दासाठी 'भाषा' शब्दाचा उपयोग होत असे.  ........पण 'भाषा' या शब्दात एक लपलेला अर्थ आहे, तो म्हणजे 'आवाज, ध्वनी'. खास करून केवळ लिपी असणा-या बोलीसच भाषा समजण्याच्या दहशतवादी प्रवृत्तीस शह द्यायचा असेल तर भाषा म्हणजे बोली किंवा बोल - अर्थात 'आवाज' मानणेच सयुक्तिक होईल."  याच संदर्भात कन्नड कादंबरीकार यू.आर.अनंतमूर्ती म्हणतात की, " भारतीय भाषांचा मूळस्रोत त्या भाषांच्या अंगणात व परसघरात आहे. पण ह्याही पलीकडे जाऊन असे स्वीकारले पाहिजे, की मान्य भाषांच्या अस्तित्वाची व प्रगतीची गुरुकिल्ली पोटभाषांच्या (बोलींच्या) हाती आहे." यावरून बोलींचे व बोली टिकवून ठेवण्याचे महत्व किती परमावश्यक आहे, हे स्पष्ट व्हावे.

     श्री.गणेश देवी यांचे यासंबंधीचे (भाषा व पोटभाषा/बोली संबंधीचे) विचार येथे पुन्हा उद्घृत करावेसे वाटतात. ते म्हणतात, "मानवी उत्क्रांतीतील कितीतरी गोष्टी अशा आहेत, की ज्यांविषयी कोणतेही शास्त्रीय विधान करणे अशक्य बनावे. त्यासंबंधी केवळ ठोकताळे बांधता यावेत आणि तेही असे की थेट त्यांच्या विरुद्धचे ठोकताळेही तेवढेच तर्कशुद्ध वाटावेत. भाषा या सामाजिक संस्थेची सुरुवात, तिच्या उद्भवाची नेमकी कारणे, तिच्या सुरुवातीच्या जडणघडणीतील घटनाक्रम हे उत्क्रांतीच्या ग्रंथातील सुरुवातीच्या व अस्पष्ट अक्षरांत लिहिलेल्या पानांप्रमाणे आहेत." ते पुढे म्हणतात की, "विश्वाची उत्पत्ती होत असताना कोणत्या प्रकारचा ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही, ह्यासंबंधी मत व्यक्त करणे शक्य असले तरीही ते मत सिद्ध करणे अशक्य आहे. ईश्वर अपौरुषेय आहे किंवा नाही यावर मत व्यक्त करण्यासारखेच तेही मत केवळ तत्त्वज्ञानात्मक तर्कसिद्धांताच्या स्वरूपाचे राहील. मानवाला व मानवाआधीच्या इतर प्राणिमात्राला, ध्वनिसंवेदन प्राप्त होण्याआधी, ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही हेही निश्चित करणे अशक्य आहे. अतीन्द्रिय अनुभवातून ऐकू येणारा सततचा ध्वनी - अनाहत नाद आणि स्वरयंत्रातून श्वास तोडून--जोडून बनविलेला ध्वनी हे दोन्ही एकाच प्रवृत्तीचे असतात किंवा नाही हे सांगणेही कठीण आहे. शिवाय अर्थव्यवहारासाठी (येथे आर्थिकव्यवहार अपेक्षित नसून शब्दार्थव्यवहार/meaning ध्वनित आहे) केवळ ध्वनीनियंत्रणाचाच मार्ग मनुष्यप्राण्याने का निवडला, डोळ्यांची भाषा विकसित करून अर्थ (meaning)- व्यवहार करण्याची क्षमता उपलब्ध असतानाही ती पूर्णपणे विकसित का केली नाही, हे सारे प्रश्न जरी विचारता आले तरीही त्यांची उत्तरे केवळ तर्काच्यापलीकडे नीटशी स्पष्टपणे मांडता येत नाहीत." हे थोडेसे लांबलेले उद्-घृत, बोलीविषयक अभ्यासाचे व बोलीच्या जतनाचे महत्व तथा बोलीचे भाषाव्यवहारातील स्थान- महात्म्य स्पष्ट करीत असल्याने हे धाडस केले आहे.        

          यासंदर्भात पोवारी बोलीचा विचार करताना काही ऐतिहासिक तथ्य सुद्धा विचारात घ्यावे लागतात हे स्पष्ट आहे. त्या अनुषंगाने ई.स.१०१० ते १०५५ या कालावधीदरम्यान होऊन गेलेले सम्राट राजा भोज हे पोवार समाजाचे प्रमुख पूर्वज असून ते स्वतः संस्कृतादि भाषांचे विद्वान होते, ते एक उत्कृष्ट व अपराजित शासकच नव्हे तर विविध विद्वत्तापूर्ण ग्रंथांचे कर्ते होते, त्यांच्या दरबारात उत्कृष्ट लेखकांची/विद्वानांची "हजेरी" असायची, हे ऐतिहासिक तथ्य लक्षात घेऊन ते आजच्या घडीला या पोवारीबोलीचे मुख्य प्रवर्तक मानल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे सम्राट राजा भोज यांच्या बृहद अशा राज्यपरिसरातील मालवा, धार या भागातील भाषिक व बोलीक* संस्कृतीचे संस्कार या पोवारीबोलीवर असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच या बोलीत आज इतक्या संक्रमणानंतरही मारवाडी, राजस्थानी, गुजराती, मालवी, निमाडी, आदि भाषा/बोलींचे अंश सापडतात.

            अकराव्या--बाराव्या शतकातील व त्यानंतरच्या मुस्लिम वंशीय आक्रमकांच्या आक्रमणानंतर तसेच नागपूर परिसरातील तत्कालीन परमार(पोवार) राज्यकर्त्यांच्या आगमनानंतर पोवार समाजात दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया घडून हा पोवार समाज वैनगंगा, वाघ, पांगोली नद्यांच्या सुपीक प्रदेशात स्थायिक झाला. शिवाय राजा जगदेव यांच्या नगरधन(रामटेक) येथील राज्य स्थापनेनंतर सुद्धा पोवार समाजातील योद्ध्यांचे विदर्भात स्थलांतर झाले व बदलत्या समयानुकुल या पोवार समाजाने तलवार त्यागून नांगर हाती धरला. या कामी गोंडवन भागातील गोंड राजांनी पोवार समाजाला जमीनदारी, मालगुजारी देऊन त्यांना शेतीसाठी जंगल/जमीन उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका निभावल्याचे आजवरच्या प्राथमिक संशोधनातून निष्पन्न होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड किल्ला आणि पोंभुर्णा/गोंडपिपरी,....... येथील संशोधन सुद्धा या पोवार समाजाच्या विदर्भातील तत्कालीन अस्तित्वाची साक्ष देतात. शिवाय मराठा/नागपूरकर भोसले यांच्या कालावधीत सध्याच्या गोंदिया जिल्ह्यातील कामठा या तत्कालीन परगण्याचे तत्कालीन प्रमुख चिमणाजी बहेकार यांच्या नेतृत्वाखाली पोवार योद्ध्यांनी कटक-युद्धात बजावलेल्या जबरदस्त कामगिरीने खुश होऊन त्या-त्या पोवार योद्ध्यांना मालगुजारी देण्यात आली, असेही काही इतिहासकारांचे निदान आहे.

            जागतिकीकरणाच्या या "उठ, जा आणि खा!" (उजाखा*) च्या युगात अचानकच प्रत्येक मानव-घटकामध्ये आपले मूळ शोधण्याची प्रेरणा कशी काय जागृत झाली, हा संशोधनाचाच विषय ठरावा. मात्र आनंदाची व कदाचित आश्चर्याची सुद्धा बाब म्हणजे या प्रेरणेने विविधतेचा दुस्वास न उमलता विविधतेतील एकता शोधण्याची प्रक्रिया सुद्धा मानव-घटकात अनायासेच कार्यान्वित झाली असल्याचे दिसून येते. त्या दृष्टीने विचार करता अशाच एका झाडीबोलीच्या एका संशोधक/अभ्यासकाचे मत या प्रकरणी विचारार्ह ठरते. त्यानुसार झाडीबोली ही मराठी भाषेची आजीच मानली जावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. कारण संस्कृत ही सर्व आधुनिक भाषांची जननी मानली तर संस्कृत ची जननी ही त्या आधुनिक भाषांची आजीच होणार ना! वस्तूतः संस्कृत ही काही स्वयंस्फूर्त/स्वनिर्मित भाषा नव्हे/नसावीच. म्हणजे संस्कृत ही संस्कारित भाषा कोणत्यातरी पुरातन बोलीपासून/बोलीतून तयार(!) झाली हे स्पष्टच आहे. आणि झाडीबोलीचे कूळ व मूळ अजूनतरी कोणालाही शोधता आले नसून झाडीबोलीतील खूप सारे शब्द मात्र संस्कृतात थोड्याबहुत फरकाने जसेच्या तसे स्वीकारले/वापरले गेले असल्याचे झाडीबोलीच्या या संशोधक/अभ्यासकाचे निष्कर्ष आहेत. पर्यायाने झाडीबोली ---> संस्कृत --> मराठी या क्रमाने झाडीबोली ही मराठीची आजी लागते, असा त्या संशोधकाचा आढावा आहे. अशाच प्रकारे पोवारी बोलीचे सुद्धा कूळ व मूळ अजूनही शोधले गेले नसल्याने पोवारी बोली सुद्धा संस्कृतची आई/सावत्र(?) आईच शोभावी! 

     या संदर्भात एका पौराणिक मिथकाची हकीगत अशी की, परशुरामाने काही विशिष्ट कारणांमुळे क्रोधप्रवण होऊन संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करण्यासाठी एकवीस वेळा तत्कालीन क्षत्रियांची सरसकट कत्तल केली. तेव्हा समाजात राजाअभावी माजलेल्या अनागोंदी, अराजक, भयावह स्थितीने आतंकित, भयकंपित व आशंकित होऊन ऋषी वशिष्ठ यांनी क्षत्रिय-उत्पत्ती साठी यज्ञ करून त्या यज्ञाग्निमधून चार क्षत्रिय वीर उत्पन्न/निर्माण(!) केले. यज्ञातून उत्पत्ती झाल्याने त्यांना "अग्नीवंशी क्षत्रिय" असे संबोधिले गेले. त्या चार वीरांपैकी एक महावीर म्हणजे पोवारांचा सर्वप्रथम पूर्वज, परमार किंवा प्रमार असे त्याचे तत्कालीन सर्वसमावेशक नामाभिधान! या परमार/प्रमार चा अपभ्रंश होता होता अखेर पोवार/पंवार/पवार हे नाव काळाच्या अंगणात स्थिर झाले. तर या तत्कालीन परमार/प्रमारांची बोली/भाषा म्हणजेच आजची ही संस्कारित पोवारी/पंवारी/पवारी बोली होय. असे हे पौराणिक मिथक लक्षात घेता पोवारी बोलीचे कूळ व मूळ शोधणे कसे व किती दुष्कर आहे हे स्पष्ट होऊन श्री.गणेश देवी यांचे यासंबंधीचे मत किती सयुक्तिक व प्रासंगिक आहे हे सुद्धा स्पष्ट होते.

      शिवाय डाॅ.दशरथ स्वामी यांच्या संशोधनपर लिखाणाचे (अग्निपुराण, पवार वंश) अवलोकन केले असता असे दिसून येते की, सम्राट अशोकाच्या अहिंसात्मक बौद्धधर्म प्रसाराच्या परिणामांमुळे त्याच्या पूत्र-पौत्रांच्या राज्यकालावधीत (इ.स.पूर्व 232 - 215) युद्धाशिवाय राज्य टिकविणे असंभव झाल्याच्या काळात लढवैय्या व योद्धा असलेल्या पोवार समाजाचा उद्गम झाला असावा, असा कयास वर्तवण्यात येतो. यावरूनही वर नमूद केलेले श्री.गणेश देवी यांच्या यासंबंधीच्या मताची महतीच अधोरेखित होते.

        पोवार समाजात प्रारंभी मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती असे दिसून येते. देवघरात एक, पुढच्या बाजूला अतिलघु चौकोन चिकटलेला थोडासा मोठा मातीचा चौकोनी बोहोला* व अंगणात दुसरा तसाच मातीचाच चौकोनी बोहोला, एवढेच पोवार समाजाचे मुख्य देव म्हणता येतील. वर्षातून दोनदा या बोहल्यांवरील काल्पनिक देवांची व लोखंडी वा इतर धातूच्या पणतीची जागा मात्र कुटूंब प्रमुखाद्वारे पूजा करून आलटून पालटून बदलली जाते. याला "देव उतरवणे" असे म्हटले जाते. हे बोहले म्हणजे शिवाचे प्रतीक मानले जातात. म्हणजेच पोवार समाज शिवपूजक होता/आहे, हे स्पष्ट होते. आता इतर समाजाच्या संपर्कात आल्यानंतर मात्र पोवार समाजातही बहू-मूर्तीपूजेने आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच पोवार समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजही पोवार समाजात हुंडापद्धत अस्तित्वात नाही. (इतर समाजाची देखासिखी मुळे काही क्षुल्लक अपवाद आढळून येतात, तेव्हा त्यांच्यावर अत्यधिक सामाजिक दबाव निर्माण होऊन त्यांनाही यापासून परावृत्त करण्याचे कार्य केले जाते.) याउलट ४०-५० वर्षांपूर्वी गरीब पोवार कुटूंबात वधूपक्षाला वरपक्षाकडून "दक्षिणा" देण्याची पद्धत होती. पोवार समाजाची ही वैशिष्ट्ये इतर समाजावर सकारात्मक प्रभाव टाकत असत. परंतु सध्याच्या या "उजाखा"च्या युगात पारिवारीक alienation, विभक्त कुटुंबे, परस्परांतील अंतर, वाढल्याने व्यक्ती-महत्वापोटी असे सर्वच सामाजिक प्रभाव प्रभावहीन ठरू लागले आहेत. शिवाय आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे पोवार समाजात "भिकारी" अजिबात नाहीत. 

       भारत सरकारच्या एका जुन्या सर्वेक्षणानुसार हिंदी ची उपभाषा/पोटभाषा/बोली म्हणून पोवारी बोलीचा/भाषेचा उल्लेख भाषासूचीत केलेला आहे. त्यानुसार पोवारी बोलणा-या भाषकांचा क्रमांक 42 वा असून 38-40 लक्ष लोकसंख्या असलेल्या पोवार समाजातील 4,25,745 पोवार लोक बोलचालीत अजूनही पोवारी बोली/भाषेचा वापर करतात, असे नमूद आहे. (ही आकडेवारी जुनीच आहे.)
     पोवारी बोली/भाषेवर सर्वप्रथम इंग्रजी भाषातज्ज्ञ सर जाॅर्ज अब्राहम गियर्सन यांनी संशोधन केले. दुसरे इंग्रजी विद्वान आर.व्ही.रसेल यांनी त्यांच्या "CASTS AND TRIBES OF C.P. AND BERAR" या ग्रंथात पोवारी बोली/भाषेचा आणखी थोडासा अभ्यास मांडला. नागपूर विद्यापीठातील डाॅ.सु.बा.कुलकर्णी यांनी प्रथमच, 1972 मध्ये पोवारी बोली/भाषेचा शास्त्रोक्त अभ्यास करून Ph.D. साठी प्रबंध सादर केला व त्यांना नागपूर विद्यापीठाद्वारे ती पदवी प्रदान करण्यात आली. 1999 मध्ये डाॅ.मंजू अवस्थी यांनी बालाघाट जिल्ह्यातील बोलींचा (पोवारी ही मुख्य बोली) अभ्यास सादर करून रायपूर विद्यापीठाची D.Lit. पदवी प्राप्त केली. त्यानंतर डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी 2011 पासून पोवारी बोली/भाषेचा भाषावैज्ञानिक पद्धतीने अभ्यासाचा विडा उचलला असून त्यांनी "पवारी ज्ञानदीप" हा महत्वाचा ग्रंथ सिद्ध केला आहे. नागपूरचेच जयपालसिंह पटले यांनी "पवार गाथा" व अन्य 5-6 पुस्तके पोवारी बोली/भाषेत प्रकाशित केली आहेत.

         यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे पोवारांचा विदर्भ संपर्क ही एक दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया आहे. अकराव्या शतकात नागपूरकडील प्रदेश मध्यप्रदेशातील धारच्या परमारवंशीय राजांच्या (राजा भोजशी संबंधित) मांडलिकीखाली होता. याची साक्ष भांदक येथील शके 1068 च्या नागनाथ मंदिरातील मराठी शिलालेखात आढळून येते. या शिलालेखात धर्मशील राजा पवार याने मंदिराचा जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे म्हटले आहे. नागपूरकर भोसल्यांच्या कारकीर्दीत तर अनेक पोवारांनी कटकपर्य॔त स्वा-या करून समशेर गाजविली आणि आपण शूर क्षत्रियांचे वंशज आहोत हे सिद्ध केले. समशेरीप्रमाणेच नांगर धरण्यातही पोवारांचा हात कोणी धरणार नाही. त्यांनी पूर्व विदर्भात व पश्चिम मध्य प्रदेशात गावोगावी तलाव बांधून वैनगंगेचे खोरे सुजलाम आणि सुफलाम करून टाकले आहे.

        पूर्व वैदर्भीय पोवारांच्या या दीर्घकालीन विदर्भ वास्तव्यामुळे त्यांच्या भाषेचा मूळ तोंडवळाच बदलून गेला आहे. तिचा घाट जरी माळवी असला तरी थाट मात्र नागपूरी (झाडीबोलीय) आहे. पोवारी बोली/भाषेची स्वर व्यवस्था अधिकांश हिंदी भाषेप्रमाणेच आहे. या बोलीत "ळ" हा ध्वनी नाही. मराठी शब्दातील "ळ"काराचा "र"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. यामुळे होळीची होरी आणि शेळीची सेरी होते. कधीकधी "ळ" चा "ड" देखील होतो. उदा. उथळ चे उथड व धर्मशाळा चे धरमसाडा असे रूप होते. शब्दारंभीच्या "व" चा "ब" होतो. जसे:- वेळू चा बेरू, वाळू चा बारू, विहीर चा बिहीर इ.
     पोवारांच्या बोली/भाषेत "श" हा ध्वनी नाही. "श"काराचा "स"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शिंगाचे सिंग व शेंगेचे सेंग होते. दन्त्य व तालव्य स्पर्शसंघर्षी ध्वनींमध्येही व्यवच्छेद आढळत नाही. प्रायः मुक्त-परिवर्तनच आढळते. यामुळे मराठीतील चांदी, चाळण, चवळी,  जांभई, जावई, जुना, झाकणी यासारखे शब्द पोवारीत चांदि, चारनि, चवरि, जांबइ, जवाई, जुनो, झाकनि याप्रमाणे उच्चारले जातात. या बोली/भाषेत "ण" हा ध्वनी नसल्याने बाणाचा बान बनतो व वेणीची बेनी बनते. शब्दारंभीच्या ए आणि ओ या स्वरांना य आणि व असे आगम होतात. यामुळे एकाचा येक व ओठाचा वठ होतो.
       पोवारीत हिंदीप्रमाणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशी लिंगे आहेत. या बोली/भाषेत आंगन, कनिस, घुबड, चमडा, जंगल, जांबुर इ. मराठीत नपुसकलिंगी असणारे शब्द पुल्लिंगी आहेत. तर नाक, पदक, परसाद, सरन, मालिस यासारखे शब्द स्त्रीलिंगी आहेत. सामान्यतः पुल्लिंगी नामे अकारान्त व स्त्रीलिंगी नामे इकारान्त असतात. विशेष म्हणजे, या बोली/भाषेत नामांना वचनविकार होत नाही. यामुळे येक घर, दुय घर, येक टुरा, दुय टुरा असेच अविचल रूप राहते. नामांचे सामान्य रूपही होत नाही. षष्ठीचा प्रत्यय "को" तर सप्तमीचा प्रत्यय "मा" असा आहे. जसे:- उनको नवकर, वको भाई, हातमा, बगीचामा, इ.
      अशा या ऐतिहासिक पोवारी/पवारी/पंवारी बोलीचे जागतिकीकरणानंतरचेे स्थान आता पुन्हा पुनर्स्थापित होत असून महाविद्यालयात शिक्षण घेत असलेेेेली पोवार समाजातील तरुण पिढी महाविद्यालयातही आपापसात सर्रास पोवारी बोलीत बोलू लागली आहे. ह्या बोलीत साहित्य-निर्मिती सुद्धा होत असून त्या साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी "राष्ट्रीय पवारी/पवार साहित्य, कला, संस्कृती मंडळा"ची स्थापना करण्यात आली असून 03 फेब्रुवारी २०१९ ला तिरोडा (जि.गोंदिया) येथे पहिले अखिल भारतीय पोवारी/पवारी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. 

        एकंदरीत "ध्वनीनिष्ठ" पोवारी बोली आता या जागतिकीकरणानंतरच्या रेट्याने "लिपीनिष्ठ" होण्याचा स्वावलंबी मार्ग अनुसरत आहे. आणि पर्यायाने प्रमाण भाषांना भिन्न-विभिन्न असे नवनवीन शब्द पूरवून प्रमाण भाषांना आणखी सुदृढ करण्यासाठी सज्ज होत आहे.
(शब्दसंख्या : सुमारे २३२५)
□□
◇विशेष टीप :- पोवार समाजाचाच एक समूह वर्धा, नागपूर या महाराष्ट्रातील तर छिंदवाडा, बैतूल या मध्यप्रदेशातील जिल्ह्यात वसला असून त्यांना भोयर पोवार/पवार असे संबोधिले जाते. त्यांची बोली सुद्धा भोयरी/भोयर पोवारी(पवारी) म्हणून संबीधिली जाते. वस्तूतः स्थलभेदामुळे या बोलीत अल्पसा फरक दिसत असला तरी पोवारी/पवारी बोली आणि ही भोयरी/भोयर पोवारी(पवारी) बोली थोड्याफार फरकाने अगदी सारख्याच आहेत.
□□
(बोलक = बोलणारे, बोहोला = मातीचा चौकोनी ओटा)
□□
@लखनसिंह कटरे
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया
(विदर्भ-महाराष्ट्र)
¤
(आधार व आभार : डाॅ.सु.बा.कुलकर्णी, श्री.गणेश देवी, डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे, श्री.जयपाल सिंह पटले)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
टीप :-
१)या लेखाचा एक संक्षिप्त भाग "अक्षरयात्रा" या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या (2018-2019 या वर्षीच्या) वार्षिकांकात प्रकाशित झालेला आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कृष्ण अना गोपी

मी बी राधा बन जाऊ बंसी बजय्या, रास रचय्या गोकुलको कन्हैया लाडको नटखट नंदलाल देखो माखनचोर नाव से यको!!१!! मधुर तोरो बंसीकी तान भू...