Sunday, May 24, 2020

झाडीपट्टी, परमार(पोवारां)चे राज्य आणि राजा भोज : एक टिपण


>> 'विवेकसिंधु' या आद्य मराठी ग्रंथाची रचनाच मुळी झाडीपट्टीतील 'अंभोरा' या तीर्थक्षेत्री झाली. (अंभोरा येथे लहान-मोठ्या पाच नद्यांचा संगम होतो.) विवेकसिंधु मधील झाडीबोलीचा शब्दवापर वरील संशोधनाला पुष्टी देतात. यावर डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी एक संशोधनात्मक ग्रंथ, विवेकसिंधु ची संशोधित प्रत, सिद्ध केला असून तो ग्रंथ अक्षय प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. या ग्रंथाच्या नागपूर येथील लोकार्पण सोहळ्यात डाॅ.श्री.पंकज चांदे, डाॅ.श्री.म.रा.जोशी, प्रा.श्री.श्री.मा.कुलकर्णी, प्रा.श्री.राम शेवाळकर यांनी त्यांच्या विद्वत्तापूर्ण व संशोधनमूल्ये असलेल्या भाषणांतून बोरकरांच्या या संशोधन कार्याला अधोरेखित केले आहे. 

>> डाॅ.श्री.म.रा.जोशी यांनी त्यांच्या सविस्तर व संशोधनमूल्ये असलेल्या भाषणांतून नमूद केल्याप्रमाणे, "झाडीमंडळाचा अभ्यास करीत असतांना आणि इतिहास पाहत असतांना 'विवेकसिंधु'च्या संदर्भात काही घटनांचा मागोवा घेणे आवश्यक आहे.  ... 'विवेकसिंधु'च्या लेखनाचा काळ शके 1110 हा आहे. याच शके 1110 मध्ये मध्यप्रदेशात *परमारांचे* राज्य होते. देवगिरीचे सिंघल यादव हे शके 1132 नंतर विदर्भात आलेले आहेत. यवतमाळ आणि अचलपूरपर्यंतच्या प्रदेशाला हेमाद्रीने व सिंघल तथा त्यानंतरच्या राजांनी पुढे आपल्या राज्याला जोडलेला आहे. ती घटना शके 1132 नंतरची आहे. म्हणजेच मुकुंदराजांचा 'विवेकसिंधु' त्या घटनेच्या अगोदर 20--22 वर्षांपूर्वी तयार झालेला होता. त्यावेळी मात्र विदर्भावर *परमारांचे* राज्य होते. परमारांच्या राजवटीत जे ग्रंथ निर्माण झाले आहेत त्यांच्यापैकी दोन ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. ... एक भोजाने लिहिलेला 'शृंगारप्रकाश' हा ग्रंथ आहे आणि दुसरा धनिकाचा 'दशरुपक' हा ग्रंथ आहे. यांच्यापैकी भोजाने आपल्या 'शृंगारप्रकाश' या ग्रंथात विशिष्ट शब्द किंवा संज्ञा वापरल्या आहेत. ... ग्रंथाच्या शब्दांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला 'व्हर्बाटियल इंडेक्स' असे नाव दिले जाते. त्या ग्रंथकाराचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व त्या ग्रंथातील शब्दाशब्दांत प्रकट होत असते. ग्रंथकाराने वापरलेले शब्द, त्या शब्दांचे वजन, त्याची वेगवेगळी अर्थप्रकृती, त्याची वलये, .... हे सारे पाहिल्यानंतर तो ग्रंथकार कोणत्या ताकतीचा आहे हे आपल्या लक्षात येत असते. मुकुंदराज हे त्यांच्यापैकी एक आहेत. ... अशा ग्रंथकारांना आपण 'बीज ग्रंथकार' या नावाने संबोधत असतो. त्यांची शब्दसंपदा अतिशय विलक्षण अशा स्वरुपाची असते. ... जेव्हा 'शृंगारप्रकाश' हा *भोजाचा ग्रंथ वाचनात आला तेव्हा असे दिसून आले की 'गति' हा एक काव्यरचनेचा प्रकार आहे. तात्काळ केलेली काव्यरचना, रसालंकारांनी युक्त अशी काव्यरचना, आशयाने व आकाराने सुटसुटीत अशी काव्यरचना, अशा रचना प्रकाराला 'गति' हे नाव आहे. डाॅ.राघवन यांनी 'शृंगारप्रकाश' या ग्रंथाचे नव्याने संपादन करून ते प्रकाशित केले आहे. त्यात भोजाची ही सर्व वैशिष्ट्ये अगदी स्पष्टपणे त्यांनी दाखवून दिले आहेत. तर 'गति' हा भोजाने वापरलेला शब्द महाराष्ट्रातील आहे; विशेषतः विदर्भातील आहे. परमारांनी विदर्भावर फार मोठ्या प्रमाणावर राज्य केले होते. याशिवाय *परमारांची अनेक घराणीदेखील विदर्भात वसली होती. त्यांचे अनेक लोक होते. भंडारा (आता गोंदिया-भंडारा) जिल्ह्यातील पोवार नावाची जी आजची जमात आहे ती सारी परमारांचीच शाखा होय. ते तिकडून (मालव्यातून?) आलेले आहेत. त्यांच्या चालीरिती जर तपासल्या तर कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो. या परमारांच्या कालखंडात निर्माण झालेले मराठी, संस्कृत किंवा हिंदी ग्रंथ जर तपासले तर मराठीच्या अध्ययनाला त्याचा फार मोठा उपयोग होतो. त्यामुळे आपण एका वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. ....." हा एवढा दीर्घ उतारा उद्घृत कारण हे की, झाडीबोलीचे अध्ययन व संशोधन हे एकूणच वैदर्भीय इतिहासाभ्यासाच्या दृष्टीनेही किती विविधांगी आणि सर्वसमावेशक आहे, याची प्रचिती यावी. आणि पर्यायाने या क्षेत्रात नवनवीन संशोधक, पुरातत्त्ववेत्ते, विद्वान महानुभावांनी शिरकाव करून या भागात दडलेले असंख्य माणिक, मोती, हिरे शोधून काढावेत, अशी स्वाभाविक अपेक्षा आहे. 

संकलक:- @ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 

No comments:

Post a Comment

कृष्ण अना गोपी

मी बी राधा बन जाऊ बंसी बजय्या, रास रचय्या गोकुलको कन्हैया लाडको नटखट नंदलाल देखो माखनचोर नाव से यको!!१!! मधुर तोरो बंसीकी तान भू...